रविवार, १७ जानेवारी, २०१६

विषय: अर्धवट सोडलेला पूल बांधण्याबाबत…


विषय: अर्धवट सोडलेला पूल बांधण्याबाबत…
प्रति,
सर्व पुरुषवर्गास.

महोदय,
     आपल्या सर्वांना हे ठाऊक आहेच की, स्त्रियांचे १० ते ५० हे वय त्याची मासिकपाळी  सुरु असण्याचा सर्वसाधारण काळ. तशी हि अगदी नैसर्गिक- वैज्ञानिक बाब. आपल्या सर्वाचं ह्या भूतलावर असणं हे या गोष्टीशी संबधीत. पण स्त्री-पुरुष यांच्यामधला हाच मुलभूत फरक! प्लेटोने सांगितलेच आहे की, " जे काम पुरुष करू शकतो ते काम स्त्रीपण करू शकते. पण जे काम स्त्री करते ते काम पुरुष नाही करू शकत!”. कदाचित, या कमतरतेची जाण ठेवून, आपण पुरुषांनी स्त्रियांवर अधिकार गाजवण्यासाठी ज्या हजारो कपटी गोष्टी केल्यात, त्याची सुरुवात मासिक-पाळीसारख्या मुलभूत गोष्टींना धार्मिकदृष्ट्या “अपवित्र” ठरवून केली.
   आज सबरीमाला आणि शनी शिंगणापूर मंदिरामध्ये महिलांना समान सन्माननी प्रवेश मिळावा यासाठी आंदोलने होताहेत. सुमारे नव्वद वर्षांआधी काळाराम मंदिरात दलितांना प्रवेश मिळण्यासाठी केलेल्या आंदोलनाची तंतोतंत आठवण करून देणारी हि घटना. त्यावेळेस दलित होते, आता त्या जागी महिला आहेत.
   त्यासाठी येत्या २६ जाने २०१६ ला “भूमाता ब्रिगेड” नावाच्या संस्थेच्या सुमारे ४०० महिलांनी हि जुनाट प्रथा मोडून स्त्रियांना ह्या पवित्रस्थानाची वाट मोकळी करून देण्याचा संकल्प सोडला आहे. त्यासाठी निवडलेला दिवसही अप्रतिम. ज्या दिवशी आपला देश एक प्रजासत्ताक म्हणून घोषित झाला, लोकांच्या हातात खरी सत्ता आली, त्याचदिवशी आपल्याला भारतीय म्हणून प्राप्त झालेल्या अधिकारांचा योग्य वापर करत, प्रजासत्ताक दिन साजरा करणे अनेक अर्थांनी अनुकरणीय आहे.
   काही हिंदुत्ववादी संघटनांनी म्हणे याचा धसका घेऊन त्यांना कांऊटर करण्याची योजना आखलीये.  म्हणताहेत, “जर त्या ४०० महिला परंपरा तोडायला – धर्म भ्रष्ट करायला येणार असल्या, तर आम्ही शनी-मंदिराभोवती २००० महिलांचे ‘संरक्षण कवच’ तयार करणार”.
    ज्या शनी-कृपेमुळे सबंध शनी शिंगणापुरात कुलुपे तर सोडाच पण घरांना दरवाजेदेखील नाहीत, त्याच देवाला हि लोकं संरक्षण देण्याची भाषा करतात. अश्यावेळी(अर्थातच अश्या वेळा अनेकदा येतात!), मला Dante या तत्ववेत्त्याचं “The Divine Comedy” आठवतं. आणि सटायरिकली हसूही येतं. त्यानी ह्या क्रांतिकारक पुस्तकाच्या माध्यमातून युरोपिअन रेनासामध्ये फार मोलाची भूमिका बजावली होती. त्यात तो धार्मिक बुवाबाजीवर म्हणालेला, “They think like a stupid, they look like a stupid and they act like a stupid ”. देव आणि धर्मावर त्याच्यानंतर काही विचारवंतांनी खूप चांगल्या संकल्पना मांडल्या. हेगल म्हणाला, “ God is an universal spirit present everywhere. तर गांधीजी म्हणाले, “God is not a person, God is a principle. बरं, ते म्हणाले म्हणून नाही तर मलापण वेळोवेळी तसा अनुभव आलाय. एखाद्या अवघड प्रसंगी मनोधैर्य वाढवायला शनीदेव नेहमी माझ्यासोबत असतात. खरा देव हा फक्त देवळापुरता सीमीत नसतो. त्याचा वावर सर्वत्र असतो. म्हणजे यांच्या संरक्षण कवचाच्या फार पलीकडे त्याचं अस्तित्व आहे.
   मग हे आंदोलन करण्याची, त्याला पाठींबा देण्याची गरज काय?
   ज्ञानेश्वर माउली पसायदानात म्हणाले आहेत, “दुरितांचे तिमिर जावो...”. गरज आहे ती यांच्यामधील ‘तिमिर’ (अंधार) नाहीसा करण्याची. त्यांना पटवून देण्याची की, बाबारे खरा धर्म तो जो मानवतेकडे जातो. ज्याच्या उपासनेनी “शांती” प्राप्त होते. आणि खोटा धर्म तो असतो जो “वैर” निर्माण करतो. जो म्हणतो, “आम्ही पाहूचं कसं घुसतात ते!”.
   आत्ता सध्यापुरतं आपण देव-धर्माला बाजूला ठेवून थोडा त्याहून अधिक मुलभूत विषय –मानवतेवर बोलूयात. हजारो वर्षांपासुन सर्व प्रकारच्या समाजांमध्ये सोयीस्करपणे स्त्रीयांना दुय्यम काय तर ‘गुलामांसारखी’ वागणूक देत आपण इथपर्यंत आलोत. कालही तेच होतं आणि आजही तेच आहे. आधी, विष्णूचे पाय दाबताना लक्ष्मी दिसत होती, अग्निपरीक्षा देताना सीता दिसत होती. आजच्या आधुनिक जगात, पायलट ऐटीत विमान चालवतो आणि एयर होस्टेस चहा-पाणी देताना दिसतात. डॉक्टर टेबल वर बसल्या बसल्या पेशंट तपासतो आणि नर्स घाणेरड्या जखमांची ड्रेसिंग करतात. आजही घरची स्त्री तिच्या स्वतःच्या घरात सर्वात जास्त राबते. १५-१५ तास अविरत काम करते. तरीही शेवटी १०० रुपय्यांच्या खर्चासाठी तिला मोकळीक नाहीये. हि परिस्थिती आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे.
    इतके दिवस स्त्रियांच्या भरवश्यावर खूप  आराम केला यारहो. पण आता कंटाळा आलाय. चेंज करावीशी वाटतीये हि लाईफस्टाईल. पण जे साचलेलं काम समोर दिसतंय ते फार मोठ्ठं आहे. मानवतेचा अर्धवट राहिलेला पूल बांधायचाय. असंही अर्धवट पुलाचा उपयोग नसतोच कधी. पूर्ण केला तर सर्वांनाच फायदा होईल. बरीच लोकं लागतील. म्हणजे आपण सर्वच असलो तर लवकर होईल काम. चला तर मग...     

-धनंजय सरनाईक

गुरुवार, २६ नोव्हेंबर, २०१५

"नोव्हेंबर सुरुवात"


संविधान दिवस आणि एकंदरीत संविधानावर आपल्या देशातील दिग्गजांनी अनेक लेख लिहिले. काही वाचनात आले, तेव्हा विचार केला आपणही बघुयात लिहुन. मग पुन्हा विचार बदलला - आपण कोण? कोण वाचणार ते? त्यापेक्षा दोन-चार लेख अजून वाचून काढुत. मग पुन्हा विचार बदलला. आपण रोजनिशी  इतरांनी वाचण्यासाठी लिहतो? त्यामुळे  मग मी रोज-रोजच्या वाचनातून फारकत घेऊन, हि लिहिण्याची प्रोसेस अनुभवावी असा ठरवलं.

तसा नोव्हेंबर महिना माझ्यासाठी लहानपणापासूनच महत्वाचा. अनेक गोष्टींची माझ्या आयुष्यात याच महिन्यात सुरुवात होण्याची दीर्घ परंपरा. आमच्या परभणी जिल्ह्यातला कारभार तसा थंड बस्त्यातला. इतर जिल्हे त्यांच्या प्रथम सत्र परीक्षा  दिवाळीआधीच उरकून घेत. आमच्या मात्र दिवाळीनंतर ठरलेल्या. त्यामुळे प्रत्येक वर्षी अभ्यासाची सुरुवात नोव्हेंबर मध्ये होत असे.

अभ्यासाची हि "नोव्हेंबर सुरुवात" करण्याची सवय इंजिनीरिंगला आल्यावर तुटली. एक म्हणजे परीक्षा डिसेंबर महिन्यात असत आणि डिसेंबर महिन्याच्या थंडीत कुठे अभ्यास करायचा असतो का? तत्सम  फालतू कारणांमुळे सबंध इंजिनिरिंगमधे माझ्या अभ्यासाची काही सुरुवात होवू शकली नाही. पण, इंजिनिरिंगच्या दिवसांमध्ये सबमिशन करिता जुलैपासून साचलेल्या असाइनमेंट लिहिण्याची "नोव्हेंबर सुरुवात" करावीच लागे. नाही तर घरी लेटर. या धाकाधाकांच्या नोव्हेंबर सुरुवातीमधल्या काही सुरुवाती या फार मनापासून आणि आनंददायी अश्या होत्या. त्यातली पहिली म्हणजे व्ही. आय. टी. त मिराज नावाचा फिल्म क्लब सुरु केला - ५ नोव्हेंबर २००९ ला. त्यानंतर दोन वर्षांनी आत्मबोध ( व्हि. आय. टी. मधील विद्यार्थ्यांनी २००६ साली सुरु केलेली एक सामाजिक चळवळ) मधील आम्ही काही मित्रांनी " चॅनल फॉर सिटीझन्स इमर्जन्स" नावाचा चॅप्टर सुरु केला - १४ नोव्हेंबर २०११ ला.

ढोबळमानानी दहावी- बारावीपर्यंत मार्क्स चांगले राहत. इंजिनीरिंगमधले सबमिशन्संसुद्धा दोन- पाच दिवस लेट होत. पण पूर्ण होत. आज, मिराज आणि आत्मबोधचा तो चॅप्टर सुद्धा जोरात चालू आहे. म्हणजे नोव्हेंबर सुरुवात माझ्यासाठी लकी ठरलीये. म्हणून ब्लोग लिहण्याची सुरुवातही याच महिन्यात करतोय!

अशीच एक मोठी "नोव्हेंबर सुरुवात" डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान सभेमधील अनेक दिग्गजांच्या साक्षीने १९४९ ला झाली. आताच्या वर्षापासून अधिकृतरीत्या आजचा दिवस "संविधान दिवस" म्हणून साजरा होणार आहे.

कदाचित काही प्रमाणात चुकतही असेल माझं. पण, आपण नेहमी walk the talk असलं पाहिजे असं कधीकाळी मनात पक्कं बसलंय. म्हणजे कश्यावरही  भाष्य करण्याआधी ते जगुन बघायचं आणि मग त्यावर actively (passively नाही) प्रतिक्रिया द्यायची. त्यामुळे खूप कमी गोष्टींवर मतप्रदर्शन करण्याचा योग येतो. "संविधान जागृती" हा त्यातला एक.

आत्मबोधमध्ये आम्ही ३०-४० वर्षांच्या पुढच्या वयोगटासाठी संगणक- इंटरनेट शिकाविण्यासाठीच्या कार्यशाळा घेतो. मुळात हे 'मॉडेलच' खूप वैशिष्टपूर्ण आहे. यामध्ये इंजिनीरिंग कॉलेजचे विद्यार्थी त्यांचे तास संपल्यानंतर कॉलेजच्या प्रयोगशाळांमध्ये त्यांच्यापेक्षा वयस्क लोकांना संगणक शिकण्यासाठी प्रेरित करतात. अर्थातच मोफत. यामध्ये आम्ही गेल्या चार वर्षांपासून -शिकविणारे विद्यार्थी  आणि शिकणारे जेष्ठ मंडळी या दोघांकरिता "संविधान जागृती" नावाचा दर दिवशी १५-१५ मिनिटांचा  उपक्रम घेतो. एक-एक विद्यार्थी संविधानाच्या वेगवेगळ्या भागाचा व्यवस्थित अभ्यास करून त्याचे सादरीकरण इतरांसमोर करतो.

या उपक्रमाचा उद्देश हा संपूर्ण संविधान A-Z शिकविणे असा नसून, सर्वांना त्याचे महत्वाचे वैशिष्ठे समजावून सांगणे, नागरिकांना त्यांचे मुलभूत हक्क तसेच कर्तव्यांबाबत अधिक सजग करणे, आजच्या काळामध्ये वेगवेगळ्या कलामांचे आपल्या जीवनामध्ये असलेले महत्व विशद करणे आणि एकंदरीतच संविधानाप्रती सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करणे असा आहे. आत्माबोधचे "Digital literacy workshop" आणि "संविधान जागृती" ह्या  कार्यक्रमासारखे स्वरूप मोठ्या प्रमाणात - देशपातळीवर "Digital India" आणि "संविधान दिवस" याच्या रूपाने दिसत आहे. कालच मी माझा मित्र अनुपला म्हणालो, " अरे बघ, मोदिजी कश्या आपल्या आयडिया चोरताहेत!". यातला गमतीचा भाग जरी सोडला तरी आज संपूर्ण देशात  "संविधान दिवस" उत्साहाने साजरा होत आहे. शाळा-शाळांमध्ये प्रस्ताविकेमधील 'धर्मनिरपेक्ष', 'न्याय', 'समानता', 'बंधुता' या शब्दांचे मोठ्या-मोठ्याने वाचन चालू आहे. परंतु, आपण सर्व भारतीयांनी या शब्दांचा संविधानाला अभिप्रेत असलेला अर्थ समजावून, त्याला अंगीकृत करून घेण्याचा प्रयत्न केल्यास मोदिजींची हि "नोव्हेंबर सुरुवात" एक नेहमीसारखा इव्हेंट न ठरता  त्यातून बरंच काही साध्य होऊ शकेल.

जय हिंद!!!

धनंजय सरनाईक